सोलापूर : महाराष्ट्रात असो व अन्य राज्यात असो स्त्रियांवर न अत्याचार झाल्याच्या घटनेवर राजकारण करणे हे न खासदारांना शोभत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली.
बदलापूरच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर भाजपाचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा समाचार घेतला. काळे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे बदलापूरच्या घटनेचे राजकारण करत आहेत हे दुर्दैव आहे. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन या घटनेबाबत आपण काय करू शकतो ? असा विचार होणे अपेक्षित आहे.
पण अशा घटनांचे राजकीय भांडवल करणे अयोग्य आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे, गुजरातमधील उदाहरण देणे यातून खासदार प्रणिती शिंदे काय साध्य करू इच्छित आहेत ? पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनेबाबत खासदार प्रणिती शिंदे काहीच का बोलत नाहीत? तिथे अत्याचार झालेली महिला ही महिला नव्हती का ? तिला झालेल्या यातना या यातना नव्हत्या का ? तिथल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही ? महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे राजकारण करण्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो. आगामी काळात तरी त्यांनी अशा घटनांवर राजकारण करु नये, असेही भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी म्हणाले.