बंगळुरू : वृत्तसंस्था
पत्नीला जंक फूड खाण्यापासून रोखणे पतीला इतके महागात पडले की पती थेट तुरुंगात गेला. आता या प्रकरणात हस्तक्षेप करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पतीला जामीन मंजूर केला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पत्नीने पतीविरुद्ध आयपीसी कलम ४९८ अ अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. या विरोधात पतीने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसमोर युक्तीवाद करताना सांगितले की, मी तिला फ्रेंच फ्राई खाण्यापासून रोखल्यामुळे, पत्नीने माझ्याविरुद्ध क्रुरतेचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी पतीविरुद्ध सुरू असलेल्या क्रूरतेच्या खटल्याला अंतरिम स्थगिती दिली आहे.
यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितले की, पतीविरुद्ध तक्रारीत केलेले दावे पूर्णपणे फोल आहेत. त्यामुळे या प्रकरणातील त्याच्याविरुद्धच्या तपासाला स्थगिती देण्यात आली आहे. ‘‘पतीविरुद्ध कोणत्याही चौकशीला परवानगी देणे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल आणि पत्नीच्या आरोपाला विश्वास देईल की तिला निर्धारित वेळी फ्रेंच फ्राईस खाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पतीविरोधातील सर्व तपास थांबवण्याचा अंतरिम आदेश देण्यात यावा.’’ उच्च न्यायालयानेही पतीला कामासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली आहे.