जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली. त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षांतील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत ८०० इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचे आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा आज जाहीर केला.
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे ७०० ते ८०० जणांनी अर्ज दिले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत तर मराठवाडा, विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत.
२९ तारखेला चर्चासत्र
येत्या २९ तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झाले आहे. या यशाचे श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या २९ तारखेला अंतरवालीत एक छोटेखानी चर्चासत्र ठेवू. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
ही राजकीय बैठक नाही
येत्या २९ तारखेला ज्यांना शक्य आहे, त्यांनी अंतरवालीत यावे. फक्त कामे बुडवून येऊ नका. थोड्या संख्येनेच या. मी काही जाहीर आवाहन करत नाही. कारण छोटा कार्यक्रम घेत आहोत. शेतीची कामे खोळंबू नये, म्हणून छोटा कार्यक्रम होईल. ही कोणतीही राजकीय बैठक नाही, फक्त एक वर्ष पूर्ण झाले, म्हणून छोटेखानी चर्चासत्र आपण घेऊ, असे जरांगे म्हणाले.