परभणी : बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांना मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात बालस्नेही पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील शेतक-यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षक रागसुधा आर. याचा पुष्पगुच्छ व शेतीतील भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रागसुधा आर. रूजू झाल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारांना वचक बसला असून त्यांनी अनेक गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यात यश मिळवले आहे.
त्या स्वत: बी.एसस्सी. अॅग्री असल्यामुळे त्यांना शेतक-यांबद्दल तळमळ आहे. त्यामुळेच त्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या संपर्कात आल्या असून आज सत्कार प्रसंगी त्यांनी शेतक-यांसोबत शेती विषयक अनेक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच तामिळनाडू विद्यापीठ उसावरती काम करत असून तामिळनाडूला गेल्यास त्या विद्यापीठांमधील सर्व विभाग पाहून सखोल माहिती घेण्यासाठी शेतक-यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याशिवाय जिथे कुठे शेतक-यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी आपण मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षक रागसुधार आर. यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.