नांदेड : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी वसंतराव चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. यामुळे त्यांना आधी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक ढासळली यामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चव्हाण यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेड काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कमी करून पक्ष पुन्हा बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात त्यांनी तत्कालीन भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करून काँग्रेसला विजय मिळवून दिला. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
वसंत चव्हाण यांचा राजकीय प्रवास
वसंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांच्या गावातून झाली. १९७८ साली नायगाव या त्यांच्या मूळगावचे ते सरपंच झाले. त्यानंतर २००२ ला जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. त्याच काळात त्यांना विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी चालून आली. पुढे १६ वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. २००९ ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये राहिले. आणि लोकसभेची निवडणूक जिंकून नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली श्रध्दांजली अर्पण
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दु:खात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे, असे पटोले यांनी म्हटले.
विजय वडेट्टीवार यांच्याकडून आदरांजली
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.