भाजपा – ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौ-यावर आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे येथील राम हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंना दिशा सालीयानचे फोटो असणारे पोस्टर आणि काळे झेंडे दाखवून हॉटेलच्या बाहेर निदर्शने केली. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकतेर्ही चांगलेच आक्रमक झाले आणि दोन्ही गटात हाणामारी झाली.
परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला आणि दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल. या घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.
पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही: दानवे
दरम्यान, काल पंतप्रधान मोदी हे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्याचा बदला म्हणूनच आज भाजपा कार्यर्त्यांकडून आदित्य ठाकरेंच्या दौ-याला विरोध होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले की, या परिस्थितीला पोलीस जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, यासंदर्भात मी काल रात्री पोलीस आयुक्तांना फोन केला होता. मात्र, तरीही त्यांनी योग्य दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलिसांनी केवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, पोलीस भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाही असा दावा ही दानवे यांनी केला.
झेंडे फडकवणारे लोक भाजपचे पेड वर्कर: संजय राऊत
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकारण सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौ-याला भाजपकडून विरोध केला जात आहे. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, हे झेंडे फडकवणारी लोकं भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.