लातूर : प्रतिनिधी
चॅलेंजर स्पोर्ट्स फौंडेशन, सोलापूर आयोजीत ‘सोलापूर अल्ट्रा आझादी रन’ या स्पर्धेत ७७ किमी धावण्याच्या स्पर्धेत लातूर येथील सपना मुंडे यांनी सहभाग घेऊन ७७ किमी हे अंतर १० तास २० मिनिटात पूर्ण करुन द्वितीय क्रमांक पटकावून एक नवा विक्रम नोंदवला. सलग ७७ किमी धावणे आणि १० तास २० मिनिटात हे अंतर पूर्ण करणे हे नक्कीच एक खडतर आव्हान होते पण ते सपना मुंडे यांनी जिद्दीने पूर्ण करुन सर्व स्पर्धकांसमोर तसेच विशेष म्हणजे महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर आणि पोलीस अधिक्षक यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आणि शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली ती रविवारी सकाळी ६.३० वाजता पूर्ण झाली. या पूर्वी सपना मुंडे यांनी दोन वेळा लातूर ते तुळजापूर हे ७५ किमीचे अंतर १० तासांत धावण्याचा पराक्रम केला आहे. जगप्रसिद्ध टाटा मुंबई मॅरेथॉन मधे हि ४२ किमी हे अंतर ५ तास १० मिनिटात पूर्ण केले आहे. लातूर ते पंढरपूर हे २०० किमीचे अंतर सायकलवरुन अवघ्या १० तासांत पूर्ण केले.
धावण्याची स्पर्धा असो की सायकलिंग करणे असो सपना मुंडे या जिद्दीने पूर्ण करतातच आणि आरोग्याप्रती जागरुकतेचा संदेश देत असतात. सपना मुंडे यांची मुलगी अवनी व मुलगा अथर्व हे सुद्धा पोहण्याच्या स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत विजेते झाले आहेत. सपना मुंडे यांनी केलेल्या या दैदिप्यमान आणि असामान्य कामगिरीचे लातूरमधील सर्व क्रीडा प्रेमींनी भरभरुन कौतुक आणि अभिनंदन केले.