मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. केंद्राप्रमाणे राज्यातदेखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे. मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ झाली. आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ही बाब मार्गी लावून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. अशी माहिती मनपाने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
प्रेस नोटमध्ये पुढे म्हटलंय की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाब देखील आता मार्गी लागली आहे.