चेन्नई : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरीने आपल्या नावावर अनेक विक्रम केले आहेत. यामुळे सध्या जसप्रीत क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकामध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती, सध्या विश्वचषकानंतर जसप्रीत बुमराह विश्रांती घेत आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये चेन्नईकर जसप्रीत बुमराहचे भव्य स्वागत करून, त्याचा सन्मान करताना दिसत आहेत.
सूत्रांच्या मते, चेन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये जसप्रीत बुमराह सहभागी झाला होता. या कार्यक्रमामध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले. जसप्रीत बुमराहचा व्हायरल झालेला व्हीडीओ पाहून याचा अंदाज येऊ शकतो. भारताचा माजी कर्णधार धोनीवर प्रेमाचा वर्षाव करणा-या चेन्नईने बुमराहलाही भरभरून प्रेम दिले आहे. जसप्रीत बुमराहचे महाराजाप्रमाणे स्वागत करून त्याला मुकुट आणि फुलांचा हार घालून सन्मान करण्यात आला.
येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने जसप्रीत बुमराहला फ्रेशर्स डे सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जसप्रीत बुमराह चेन्नईला गेला होता. यावेळी त्याचे तेथे भव्य स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हीडीओ जसप्रीत बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.