मुंबई : प्रतिनिधी
ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव आहे, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. कोट्यवधींचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला. या घटनेनंतर, आमदार सत्यजित तांबे यांची फेसबूक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या घटना पाहता जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश नागरिकांसाठी दर्जेदार प्राथमिक सुविधाही उभारू शकत नाही हे सत्य लपून राहत नाही. सरकार कोणाचेही असो भ्रष्टाचारामुळे ‘स्वाभिमान’ मात्र संपूर्ण महाराष्ट्राचा जमीनदोस्त होत आहे, असे तांबे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम करणारे ठेकेदार, त्यांच्या निविदा प्रक्रियेवर ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत ते सर्व अधिकारी, त्या ठेकेदाराचे बिल काढणारे सर्व अधिकारी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ही सगळी चौकशी करण्यासाठी फक्त दोन दिवस खूप होतील, व एसआयटी- फिसायटीची गरजच नाही, अशा शब्दांत तांबेंनी प्रशासनावा खडेबोल सुनावले आहेत.