सोलापूर : देगाव रोडवरील स्वामी समर्थ नगरात चिखलामुळे घंटा गाडी येण्याची अडचण झाली आहे. त्यासोबत पंधरा फूट खोलीच्या ड्रेनेजवर झाकण नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.स्वामी समर्थ नगरात नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वसाहतीमध्ये घरांची संख्या वाढू लागली आहे. त्यासोबत नागरिकांना अनेक सुविधांची गरज भासत आहे. नागरिकांनी नियमित कर भरणा सुरु केला आहे.
पण त्या तुलनेत नागरिकांच्या गैरसोयी मात्र वाढल्या आहेत. महानगरपालिकेने ड्रेनेज योजनेच्या अंतर्गत केलेली पंधरा फूट खोल असलेली ड्रेनेज लाइन उघडीच ठेवली आहे. लाइन खोल असल्याने धोकादायक ठरली आहे. सुरवातीला एक शेळीचे पिल्लू या खोल खड्डयात पडल्याने मृत्यू पावले. लहान मुले या ठिकाणी जाऊ नयेत म्हणून नागरिकांनी स्वतःच त्याच्या भोवती लोखंडी पत्रे लावून धोक्यापासून संरक्षण केले.
तसेच या खड्ड्यावर झाकण बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली पण त्याकडे दुर्लक्ष केले.पावसाळ्यात मुख्य अॅप्रोज रोडवर चिखल झाल्याने कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी देखील वसाहतीमध्ये येऊ शकत नाही. वसाहतीत अन्य लांबच्या गल्ल्यात घंटागाडी जाऊ शकत नाही. त्यामुळे घंटागाडीचे वेळापत्रक बिघडले आहे. सुरवातीपासून या वसाहतीच्या नागरी समस्या कायम आहेत. समस्या सोडवण्यासाठी कोणाचीही मदत मिळत नाही. निदान अॅप्रोच रस्ता झाला तर रुग्णांची ने आण करणे व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सोय होऊ शकते.
नागरीकांची रस्ते नसल्याने फार मोठी अडचण होते. किमान एक मुख्य रस्ता पक्का झाला तर नागरिकांना ते सोयीचे पडेल. त्यातच ड्रेनेज लाइनचा खोल खड्डा धोकादायक बनला आहे.