पंढरपूर : वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरपुरात पोहोचल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे चंद्रभागा वाळवंटातील जुना दगडी पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पाणी पंढरपुरात पोहोचल्याने चंद्रभागा वाळवंटातील मंदिरांनाही पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे पुंडलिक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाणे बंद झाले आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले भाविक पुंडलिकाचे लांबूनच दर्शन घेऊन समाधानी होत आहेत. तर जुन्या दगडी पुलावर पाणी आल्याने पोलिस प्रशासनाने बॅरिकेटींग करून तो पूल ये- जा करण्यासाठी बंद केला आहे.
. पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड, मुंढेवाडी या गावांतील नदीवरील पुलावर पाण्याची पातळी गेली आहे. त्यामुळे अजनसोंड-मुंढेवाडी येथे बॅरिकेटिंग करून रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. परिसराची प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगरअभियंता नेताजी पवार, पंढरपूर सर्कल अधिकारी विजय शिवशरण, तलाठी अमर पाटील यांनी पाहणी केली आहे.