सोलापूर : खासगी डॉक्टरांची वाढलेली तपासणी फी, त्यांची महागडी औषधे आणि तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने अनेक रुग्ण आता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयाकडे वळत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असूनही सिव्हिलमधील डॉक्टर चांगली सेवा देत आहेत. पण त्यांनी लिहून दिलेली औषधे मात्र अनेक वेळा बाहेरून घ्यावी लागत आहेत. यामुळे रुग्णांना याचा मोठा फटका बसत असून तशा तक्रारी रुग्णांकडून होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून, धाराशिव जिल्हा आणि शेजारील कर्नाटक, तेलंगणा आदी भागांतून रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येतात. यामुळे दररोजची रुग्णसंख्या ही दीड हजारांपेक्षा जास्त होत आहे. यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे दररोज स्वतः हॉस्पिटलमध्ये राऊंड मारतात, रुग्णांची विचारपूस करतात. यामुळे अनेक डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांचे आत्मीयतेने उपचार करत आहेत. पण काही डॉक्टरांची चिडचिडही पहायला मिळते. अशा कर्मचाऱ्यांमुळे सिव्हिलची प्रतिमा समाजात मलिन होत आहे, असे काही रुग्णांचे म्हणणे आहे.
सध्या दररोज हॉस्पिटल स्वच्छ केले जात आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये येणारा कुबट वास खूप प्रमाणात कमी झाला आहे. शिवाय स्वच्छता ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. हा बदल काही दिवसांपासून दिसून येत आहे. पण मागील काही दिवसांपूर्वी एक रुग्ण दोन नंबर ओपीडीमध्ये उपचारासाठी गेला. तेथील वरिष्ठ डॉक्टराला उपचारासाठी दाखवल्यानंतर त्या डॉक्टराने प्रशिक्षणार्थी डॉक्टराकडे तपासणी करा असे सांगितले. रुग्णाने तुम्ही अनुभवी आहात. तपासणी तुम्ही करावी अशी विनंती केली. पण रुग्णाचे ऐकू न घेता त्यांना तसेच पाठवले.
त्याच दरम्यान, डीन राऊंडवर आले. त्या रुग्णाने ही घटना त्यांच्या कानावर टाकली. त्यावेळी रुग्णाला घेऊन जाऊन त्यांनी डॉक्टरांना सूचना केल्या. यानंतर मात्र डॉक्टराचे हावभाव बदलले. असा अनुभव एका रुग्णाने सांगितला. एका रुग्णालातपासणीनंतर डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. ती औषधे घेण्यासाठी रुग्ण औषधांच्या रांगेत थांबला. पण त्याचा नंबर आल्यानंतर मात्र ही औषधे येथे नाहीत, बाहेरून घ्या असे सांगण्यात आले. यामुळे रुग्ण नाराज होऊन बाहेरून औषधे घेण्यासाठी गेला. तेथे ती औषधे जवळपास साडेतीनशे रुपये असल्याचे सांगितले. यामुळे नाईलाजाने बाहेरून औषधे घ्यावी लागली, असा अनुभव रुग्णाने सांगितला.