26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरउजनीतून भीमा नदीत सोडले ५० टीएमसी पाणी

उजनीतून भीमा नदीत सोडले ५० टीएमसी पाणी

सोलापूर : उजनी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडायला सुरवात झाली. उजनी धरण १०० टक्के भरल्यापासून २२ ऑगस्टपर्यंत उजनी धरणातून तब्बल ५० टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले असून कॅनॉलमधून १७०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. मात्र, सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने त्यातून पाणी कोणीच घेत नसल्याने तेही पाणी नद्यांनाच मिळत असल्याची स्थिती आहे.

उजनी धरण १०० टक्के भरल्यानंतर ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्याचवेळी धरणावरील विद्युत प्रकल्पासही दररोज १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. मागील २२ दिवसांत या विद्युत प्रकल्पातून तब्बल ६६ लाख युनिट (अंदाजे २ कोटी रुपये) वीज तयार झाली आहे. अजूनही धरणातून या प्रकल्पाला पाणी सोडणे सुरूच असून किमान एक महिनाभर विद्युत निर्मिती अशीच सुरू राहू शकते, अशी सद्य:स्थिती आहे.

जुलैअखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण अवघ्या काही दिवसांतच उपयुक्त साठ्यात आले. त्यानंतर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर भीमा नदीसह कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यात आले. त्याचवेळी धरणावरील विद्युत प्रकल्पासाठीही २४ तास पाणी सोडले जात आहे. दररोज तीन लाख युनिट (प्रतितास १२ हजार ५०० युनिट) वीज निर्मिती तेथून होत आहे.

उजनीसह अन्य धरणांवरील विद्युत प्रकल्पातून तयार होणारी वीज ‘महावितरण’कडून अंदाजे साडेतीन रुपये दराने खरेदी केली जाते. सध्या उजनी धरणात दौंडवरून एक लाख क्युसेकचा विसर्ग जमा होत असून अजून पावसाळा एक महिनाभर आहे. त्यामुळे उजनीवरील विद्युत प्रकल्पातून आणखी एक महिनाभर तरी वीज निर्मिती सुरू राहील, अशी स्थिती आहे.

दरम्यान, उजनी धरणातील पाण्यावर जिल्ह्यातील शेती अवलंबून असून पावणेबारा लाख हेक्टरपैकी जवळपास दोन लाख हेक्टरला उजनीचेच पाणी आहे. जिल्ह्यातील खरीप पिकांखालील क्षेत्र वाढीस उजनी धरणाचा मोठा वाटा असून सध्या सर्वाधिक साखर ४० हून अधिक कारखाने सोलापूर जिल्ह्यातच आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR