सोलापूर : जिल्हा परिषद सेवेत असताना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन दिव्यांगत्वाचे लाभ घेणाऱ्या बोगस दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसे पत्र पाठविल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी होणार आहे.
जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना अपघात, अचानक दिव्यांग प्राप्त झालेल्या व दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या मात्र यूडीआयडी कार्ड नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत शासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून विविध शासकीय लाभ घेतल्याचा दावा अनेक दिव्यांग कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील बोगस प्रमाणपत्र देऊन लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन पदोन्नतीचा लाभ घेतला आहे. खरे दिव्यांग पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यामुळे फेरतपासणी होणे अपेक्षित आहे.
अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेकडून दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे.पुणे विभागीय उपायुक्तांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांत दिव्यांग बनावट प्रमाणपत्र सादर करुन विविध शासकीय लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने सर्व विभागांतील विभागप्रमुखांकडून दिव्यांगाचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यासाठी पत्र काढले आहे.