26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिसांसाठी ई-तक्रारीची नोंद घेणे आता बंधनकारक!

पोलिसांसाठी ई-तक्रारीची नोंद घेणे आता बंधनकारक!

व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलद्वारेही तक्रार करता येणार ‘भारतीय न्याय संहिता’मुळे नागरिकांना दिलासा

मुंबई : देशभरातील गुन्हेगारीत आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून यावर सरकारने फौजदारी कायद्यात नवीन तरतूद करीत ऑनलाईन तक्रार म्हणजेच ई-तक्रार करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन तक्रारीमुळे वेळेसह अनेक अडथळे दूर होणार असल्याने आता पोलिसांना ई-तक्रारीची नोंद घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पोलिसांची मदत मिळविण्यासाठी देशभरातील कोणत्याही ठिकाणावरून आपली फिर्याद ऑनलाईन नोंदविता येणार आहे. तसेच सदर नवीन सुविधा महिलांना अधिक उपयोगी पडणार आहे. यामुळे पोलिसांची वेळेवर मदत पोहचण्यासही मदत होऊ शकणार आहे. दरम्यान नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींमुळे पोलिस विभागाच्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून दैनंदिन गुन्ह्याशी संबंधित प्रक्रियेसह प्रशासकीय कामकाजात या नव्या कायद्यांमुळे बदल झाल्याची माहिती पोलिस अधिका-यांकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना देशभरातून कुठूनही ई-तक्रार करता येत असल्याने त्या तक्रारीची दखल घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. अट मात्र एकच आहे की ई-तक्रारीच्या तीन दिवसांमध्ये पीडित व्यक्तीने ठाण्यात जाऊन एफआयआरची प्रक्रिया पार पाडणे देखील आवश्यक आहे. त्यानंतर पोलिस उर्वरीत कार्यवाहीला सुरूवात करतील.

आधुनिक युगात आधुनिक कायदे
इंग्रजकालीन आयपीसी म्हणजेच ‘इंडियन पिनल कोड’चा वापर २०२४ मध्ये थांबविण्यात आला. १ जुलैपासून देशात ‘भारतीय न्याय संहिते’ला प्रारंभ झाला. यात कायद्यातील बदलांसह अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत त्याला अधिकृत दर्जा देखील दिला आहे. छायाचित्रण, सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले संभाषण, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आदी तांत्रिक बाबी कायदेशीररीत्या गृहित धरल्या जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेलद्वारे होणारी तक्रार देखील गृहीत धरली जाते.

कुठे करणार तक्रार?
देशातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ आहेत. त्याच बरोबर शहरी पोलिस स्थानकाचेही संकेतस्थळ आता अ‍ॅक्टीव्ह करण्यात आले आहे. आपल्याला तक्रार नोंदविण्याची असल्यास आपण आपल्या स्मार्टफोन किंवा कोणत्याची तत्सम स्मार्ट गॅझेट जसे कम्प्यूटर, लॅपटॉपवरून मेलव्दारे किंवा व्हॉटस्अ‍ॅपव्दारे आपल्या तक्रारीची नोंद करता येते.

ई-तक्रारीनंतर काय करावे लागणार?
ई-तक्रारीची नोंद केल्यानंतर सदर तक्रारदार, पीडित फिर्यादी व्यक्तीने ज्या पोलिस स्थानकाच्या संकेत स्थळावर आपल्या तक्रारीची नोंद केली आहे. त्या पोलिस स्थानकात तीन दिवसांच्या आत जाऊन एफआयआरची प्रक्रिया पार पाडणे अत्यावश्यक आहे.

राज्यभरातील पोलिस स्थानकाला स्वतंत्र ई-मेल आयडी
महाराष्ट्र राज्यातील पोलिस महासंचालक कार्यालयाने मुख्य पोलिस घटकासह त्या अंतर्गत येणा-या प्रत्येक पोलिस ठाण्याला स्वतंत्र ई-मेल आयडी दिले आहेत. तसेच संपूर्ण संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. नागरिक त्यावर तक्रार करु शकतात. त्याची निश्चित दखल घेतली जाणार असल्याचे आवाहनही पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR