लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मागणीला लातूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद देत लातूर जिल्हा बँकेकडून पगारदार खातेदार यांना अपघात विमा कवच देण्यात आले आहे. बँकेतून पगार होणा-या खातेदारांना ४५ लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण बँकेने दिले आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक वाहिनी तसेच शेतकरी, पगारदार कर्मचारी वर्गांच्या अडीअडचणीला मदत करणा-या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्हा बँकेत मासिक पगार होणा-या कर्मचा-यांना सुरक्षितता पुरवणे या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाने पगारदार १०,३३६ अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत अपघात विमा कवच योजना स्वीकारलेली असून पॉलिसी दि. २५ जुलै २०२४ पासून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पगारदार कर्मचा-यांच्या शाखेतील बचत खात्यावर जमा होणा-या निव्वळ वेतनानुसार १० लाख रुपये ते ४५ लाख रुपयांपर्यंत अपघाती मृत्यू करिता हा विमा संरक्षण लागू करुन होणारी प्रीमियम (विमा हप्ता) रक्कम बँकेने स्वनिधितून अदा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक कर्मचारी संघटनेच्या मागणीला बँकेच्या संचालक मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत विमा कवच संरक्षण दिल्यांने पगारदार कर्मचारी यांचेकडून बँकेच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील शाखांचा विस्तार जिल्ह्यातील विकसित रस्त्यांचे जाळे वेगवान पसरत असून सध्याची जीवनशैली विचारात घेऊन धकाधकीच्या जीवनात पगारदार कर्मचा-यांना सुरक्षितता पुरवणे अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख व संचालक मंडळ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन संचालक मंडळ यांच्या निर्णयानुसार पगारदार कर्मचारी यांना अपघाती विमा कवच देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत पगार असणा-या जिल्ह्यातील प्राथ मिक व माध्यमिक शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.