23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रआशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत जाहीर

मुंबई : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. 1 एप्रिल, 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित 1.05 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास 10 लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास 5 लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR