नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालासाठी नवे मूल्यमापन मॉडेल प्रस्तावित केले आहे. त्यानुसार इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण या निकालात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या प्रस्तावाद्वारे व्यावसायिक आणि कौशल्य आधारित प्रशिक्षणावर जोर देण्यात आला आहे. एनसीईआरटीने हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे.
एनसीईआरटीने इस्टॅब्लिसिंग इक्विव्हॅलेन्स अॅक्रॉस एज्युकेशन बोर्डस् या शीर्षकाखाली केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे. यामध्ये इयत्ता १० आणि १२ साठी प्रगतीशील मूल्यमापन दृष्टीकोन समाविष्ट असून नवीन फ्रेमवर्क शैक्षणिक वर्ष दोन संज्ञांमध्ये विभागण्यात आला आहे. अहवालाच्या शिफारशींनुसार इयत्ता बारावी बोर्डाच्या निकालांमध्ये आता इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीमधील गुणांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
इयत्ता नववीतील एकूण गुणांपैकी १५ टक्के, इयत्ता दहावीतील २० टक्के आणि इयत्ता अकरावीतील २५ टक्के गुण इयत्ता बारावीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजे इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतच्या एकूण गुणांच्या ६० टक्के गुण बारावीच्या निकालात समाविष्ट होतील. उर्वरित ४० टक्के गुण बारावीच्या गुणांवर दिले जातील. यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नव्या प्रस्तावानुसार इयत्ता नववीमध्ये ७० टक्के रचनात्मक आणि ३० टक्के योगात्मक विभाजन असेल तर इयत्ता दहावीमध्ये समसमान रचनात्मक आणि योगात्मक गुण दिले जातील. तसेच इयत्ता अकरावीत ४० टक्के रचनात्मक आणि ६० टक्के योगात्मक गुण दिले जातील. तसेच इयत्ता बारावीमध्ये ३० टक्के रचनात्मक आणि ७० टक्के योगात्मक विभाजन असेल.
रचनात्मक आणि योगात्मक पद्धत
इयत्ता बारावीसाठी मूल्यपामन रचनात्मक आणि योगात्मक पद्धतीने विभागले जाईल. रचनात्मक मूल्यमापनात आत्म-चिंतन, विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ, शिक्षक मूल्यांकन, इतर स्पर्धांमधील सहभागानुसार गुणांकन केले जाईल तर योगात्मक मूल्यमापनात परीक्षेतील गुणांचा विचार केला जाणार आहे.