हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू आहे. पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवार दि. २६ नोव्हेंबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसने तेलंगणात काय काम केले? असा प्रश्न केसीआर यांनी एका सभेतून काँग्रेसला विचारला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधींनी केसीआरवर निशाणा साधला. राहुल म्हणाले, काँग्रेसने काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने काय केले ते मी त्यांना सांगतो. ज्या रस्त्यांवर केसीआर चालत आहेत, ते रस्ते काँग्रेसने बांधले आणि ज्या शाळाकिंवा विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले, तेदेखील काँग्रेसनेच बांधले आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, पीएम मोदी जे काही बोलतात, तेच केसीआरही बोलतात. केसीआर संसदेत पंतप्रधान मोदींना मदत करतात आणि मोदी राज्यात केसीआर यांना मदत करतात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढतो. माझ्यावर २४ केसेस आहेत. ईडीने पाच दिवस माझी ५५ तास चौकशी केली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, माझे घर काढून घेण्यात आले. केसीआरवर एकही केस नाही, त्यांना धमकी येत नाही. केसीआर पंतप्रधान मोदींसोबत नसतील तर, मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही? माझे दोन लक्ष्य आहेत, पहिले म्हणजे केसीआरला हरवणे आणि त्यानंतर केंद्रात मोदींना हरवणे, अशी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.