अमरावती : एक अनोखी घटना तेलंगणातून समोर आली आहे. जिथे एका पत्नीने आपल्या पतीचे दुस-या महिलेसोबत लग्न लावून दिले आहे. पत्नीनेही पतीच्या लग्नात आवश्यक ते सर्व विधी पार पाडले आहेत. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. गुडुरू गावातील सरिता आणि सुरेश यांचा १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलेही आहेत.
एक सुंदर कुटुंब, घरात सर्वजण आनंदाने राहत होते, पण एके दिवशी सरिताला एक गोष्ट कळली ज्यामुळे ती आपल्या पतीला दुस-या स्त्रीशी लग्न करण्यापासून रोखू शकली नाही आणि तिने मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न करून दिले. आपल्या पतीचे एका महिलेवर प्रेम असल्याचे सरिताला समजले. संध्या असे या महिलेचे नाव आहे. संध्या ही महबूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती मतिमंद आहे. संध्याला आपला नवरा आवडतो हे जेव्हा सरिताला कळले तेव्हा तिने काहीही विचार न करता आपल्या नव-याचे लग्न संध्याशी करायचे ठरवले आणि दोघांचे लग्न लावून दिले.
हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. संध्याच्या लग्नात झालेल्या सर्व विधींमध्ये सरिता सहभागी झाली होती. संध्याची मानसिक स्थिती अगदी लहान मुलासारखी आहे, ती तिच्या दैनंदिन कामांसाठीही इतर लोकांवर अवलंबून असते. हे सर्व माहीत असूनही सरिताने संध्याच्या भावनांचा आदर केला आणि तिचे लग्न पतीसोबत करण्याचा निर्णय घेतला. सरिताच्या या पावलाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या प्रकरणी सरिताने सांगितले की, संध्या ही तिच्या पतीच्या मामाची मुलगी आहे. तिला आपली धाकटी बहीण मानण्यासाठी तिने तिचे तिच्या पतीशी लग्न केल्याचे तिने सांगितले. हा विवाह स्थानिक चर्चेचा विषय ठरला. तसेच या लग्न सोहळ्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.