मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. मालवण येथील घटना दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे. याबद्दल एकदा नाही तर शंभर वेळा मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागायला तयार आहे. या घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच त्या ठिकाणी शिवरायांचा भव्य व मजबूत पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. पुतळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी व नवीन पुतळ्याच्या उभारणीसाठी तज्ज्ञांच्या दोन स्वतंत्र समित्या तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला मालवणच्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने आक्रमक होत या घटनेचा राज्यभरात निषेध होत आहे. सरकार विरोधात महाविकास आघाडीनेही रविवारी जोडे मारो आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी संबंधित अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस अॅडमिरल अजय कोचर, रियर अॅडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके आदी उपस्थित होते.
दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी व नवीन पुतळ्याच्या उभारणीसाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. एक समिती पुतळा कोसळण्यामागच्या कारणांचा शोध घेईल. समिती पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या संदर्भात जबाबदारी निश्चित करेल. यात स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिका-यांचा समावेश असलेली तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.
नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदलदिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता; परंतु आता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. पुन्हा नव्याने उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
पुतळा उभारणीसाठी नेमणार तज्ज्ञांची समिती
राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचाही निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मालवण येथे झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारण न करण्याचे आवाहन केले.