23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयअब्जाधीशांच्या संख्येत तब्बल २९ टक्क्यांनी वाढ

अब्जाधीशांच्या संख्येत तब्बल २९ टक्क्यांनी वाढ

देशातील अब्जाधीश, हुरून इंडिया रिचलिस्टचा रिपोर्ट जारी, गौतम अदानी देशात सर्वांत श्रीमंत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अब्जाधीशांच्या संख्येत तब्बल २९ टक्क्यांनी वाढ झाली असून आता ही संख्या ३३४ झाली आहे. हुरून इंडिया रिचलिस्टने २९ ऑगस्ट रोजी अब्जाधिशांची यादी जाहीर केली. त्यात ही नवी यादी समोर आली असून, या यादीनुसार प्रतिपाच दिवसांत एका अब्जाधिशाची भर पडत आहे. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी दुस-या क्रमांकावर आहेत.

हुरुन इंडिया रिचलिस्टच्या यादीत मुंबई पहिल्या आणि दिल्ली दुस-या स्थानावर आहे तर बंगळुरूला मागे टाकून हैदराबादने तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत १७ नव्या अब्जाधीशांची वाढ झाली आहे. रेजरपेचे संस्थापक हर्षिल माथूर आणि शशांक कुमार हे या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. दोघेही ३३ वर्षांचे आहेत तर त्यांच्या खालोखाल झेप्टोचे २१ वर्षीय कैवल्य वोहरा आणि झेप्टोचे २२ वर्षीय सहसंस्थापक आदित पालिचा दुस-या क्रमांकावर आहेत. या वर्षीच्या यादीत ९० च्या दशकात जन्मलेल्या ११ लोकांचा समावेश आहे. दरम्यान, गौतम अदानी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले असून, त्यांच्या अदानी समूहाची एकूण संपत्ती १,१६१,८०० कोटी तर दुस-या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची एकूण संपत्ती १,०१४,७०० कोटी रुपये आहे.

यावर्षी हुरुन रिचलिस्टमध्ये १ हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मालमत्ता असलेले १५३९ लोक आहेत तर यामध्ये २७२ जणांची नव्याने नावे जोडण्यात आली आहेत. आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि चित्रपट निर्मिती कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील त्याच्या भागीदारीमुळे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने वयाच्या ५८ व्या वर्षी ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह प्रथमच श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, देश आशियातील संपत्ती निर्मितीचे इंजिन म्हणून उदयास येत आहे. चीनच्या अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे तर भारतात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हुरुन इंडिया रिचलिस्ट २०२४ च्या यादीत शाहरुख खानने भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीनुसार शाहरुखची एकूण संपत्ती ७,३०० कोटी रुपये आहे तर फोर्ब्स २०२३ च्या अहवालानुसार मागच्या वर्षी त्याची एकूण संपत्ती ६,३०० कोटी रुपये होती. एका वर्षात शाहरुख खानच्या संपत्तीत एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शाहरुखसह अनेक
सेलिब्रिटी अब्जाधीश
शाहरुख खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जुही चावला, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचीही नावे या यादीत आहेत. या स्टार्सनीही या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. या यादीनुसार अमिताभ बच्चन यांची संपत्ती १६०० कोटी, जुही चावलाची एकूण संपत्ती ४,६०० कोटी, हृतिक रोशनची संपत्ती २ हजार कोटी आणि करण जोहरची एकूण संपत्ती १४०० कोटी आहे. या यादीत शाहरुख खाननंतर जुही चावलाचे नाव दुस-या क्रमांकावर आहे. त्यानंतर हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि शेवटी करण जोहरचे नाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR