पुणे/मुंबई : शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत कारण राज्यात २ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे की कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. तसेच जायकवाडी धरण ही १०० टक्के भरणार असल्याचेही डख यांनी सांगितले आहे.
पंजाब डख यांनी आज एक हवामान अंदाज व्यक्त केला असून ज्यानुसार शेतक-यांनी उसाला खत टाकणे, उडीद मूग काढून घेणे, असे कामे करून घेण्याचे सांगितले आहे. कारण राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये २ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. तर तो पाऊस ६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे. या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. सध्या जायकवाडी धरण ७० टक्के भरले असून २ ते ३ दिवसांत ते ८० टक्केच्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. धरणाखाली असलेले दहा ते बारा बंधारे या मुसळधार पावसाने भरणार असल्याचे ही पंजाब डख यांनी सांगितले आहे.
पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार
सप्टेंबरमध्ये होणा-या पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा देशात आतापर्यंत ७ टक्के पाऊस अधिक झाला आहे.
बहुतांश जिल्ह्यात पाऊस
गेल्या काही दिवसापासून राज्यात चांगला पाऊस होत आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.