26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रजागावाटपात महायुतीमध्ये धुसफूस?

जागावाटपात महायुतीमध्ये धुसफूस?

अजित पवार गट ६० पेक्षा अधिक जागा लढविणार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याआधीच महायुतीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत ६० पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि युवकांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरे जायचे याबाबत सखोल मार्गदर्शन युवक पदाधिका-यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला किती जागा लढणार याबाबतही त्यांनी खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या ५४ आमदार आहेत. तर दोन आमदारांचा पाठिंबा आहे. शिवाय काँग्रेसचे ४ आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यामुळे ६० जागा या आपल्याच आहेत. या जागांवर आपण लढणार हे निश्चित आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी सध्यातरी ६० जागा लढण्याचे सांगितले असले तरी ९० ते ९५ जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. यामुळे ते तसा दावा करू शकतात. मात्र त्यापैकी किती जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभेत राष्ट्रवादीला कमी जागा
लोकसभेला अजित पवार गटाला कमी जागा देण्यात आल्या होत्या. यामुळे यावेळी अजित पवार गट जास्त जागा मागणार हे निश्चित आहे. दरम्यान, विधानसभेत भाजपने १२५ जागांचे टार्गेट ठेवले आहे. तर शिंदे शिवसेनाही १०० जागांवर डोळा ठेवून आहे. यामुळे जागावाटपात महायुतीमध्ये धुसफूस होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR