मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप करताना भाषेचा स्तर खालावला आहे. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. मला विष पचवायची सवय आहे, असे सांगताना फडणवीसांनी त्यांच्या राजकारणामागची भूमिका स्पष्ट केली.
एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी राजकारणात जेव्हा आलो, त्यावेळी एकच गोष्ट शिकलो की, राजकारणात तुमच्याकडे संयम असला पाहिजे. शिव्या ऐकण्याची सवय असली पाहिजे. तुम्हाला विष पचवता आले पाहिजे. आता तर गेली दोन वर्षे तुम्ही बघतच आहात. मी किती विष पचवतो. त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे, असे मिश्कील विधान फडणवीसांनी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात पदे भोगण्या करता आलेलो नाही. संपत्ती तयार करण्यासाठी आलो नाही. २५ वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. कुठलीही शाळा उघडली नाही. कॉलेज उघडले नाही. साखर कारखाना उघडला नाही. सुतगिरणी उघडली नाही. कुठलेही स्वत: करिता वैयक्तिक साम्राज्य तयार केले नाही. केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल, ती करण्याकरिता इथे आहे.