28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात लंपीचा प्रादुर्भाव!

राज्यात लंपीचा प्रादुर्भाव!

पुणे : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात थैमान घातलेल्या लंपी रोगानं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. जनावरांच्या त्वचेवर गाठी, व्रण येऊन आतून पोखरणा-या या रोगाचा राज्यातील काही गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांसह पशुपालकांना चांगलीच धास्ती बसली आहे. यावर जनावरांना वेळीच प्रथमोपचार आणि लसीकरण करून आणण्याचा सल्ला पशुवैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. राज्यात जनावरांना लंपीची लागण होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.

राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुधव्यवसाय करतात. या आजारामुळे दोन वर्षांपूर्वी अनेक दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. तर अनेक जनावरे भाकड झाली. परिणामी शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. आता वेळेत लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.

आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथीना सूज येते. सुरवातीस ताप येतो, दुधाचे प्रमाण कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, हळूहळू डोके, मान यासह कास इ. भागाच्या त्वचेवर १०-५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात, तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो, डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, डोळ्यांची दृष्टी बाधित होते, पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात. कीटकांपासून होणा-या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असून पशूपालकांनी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

दुधाळ जनावरांसह वासरांचीही घ्या काळजी
जनावरांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती कमी असल्यानं कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्यांना लगेच होतो. यात वासरे दगावण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे शेतक-यांसह पशुपालकांना दुधाळ जनावरांसह वासरांचीही काळजी घेणं आवश्यक आहे.

अशी करा उपाययोजना
जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, जनावरांना गोचीड यापासून मुक्त ठेवावे. तसेच वातावरणाबरोबरच बाजारातून येणा-या जनावरांकडून इतर पशूना संसर्ग होत आहेत. त्यामुळे पशुपालकांना बाजारातून आणलेले जनावरे इतर गुरांपेक्षा वेगळी ठेवावीत. त्यांना जवळपास महिनाभर लांब अंतरावर बांधावे. तरीही लम्पीची बाधा झाल्यास तत्काळ उपचार करून घ्यावेत, जेणेकरून जनावरे लवकर दुरुस्त होतील, अन्यथा आजार वाढल्यास दुरुस्त होण्यास विलंब होऊ शकतो. चिलटे, माश्या, गोचीड आणि डासांद्वारे लम्पी रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सजग होणं महत्त्वाचं आहे. गोठ्यातील भिणभिणणा-या माशांचा बंदोबस्त करावा.

बाधित जनावरांच्या स्पर्शाने ही इतर जनावरांनाही आजाराची लागण होते. त्यामुळे बाधित जनावर हे इतर जनावरांपासून सुरक्षित अंतरावर बांधावे.लम्पीचे विषाणू संक्रमणानंतर रक्तात पसरल्यावर एक ते दोन आठवडे राहतात. त्यामुळे शेतक-यांनी सतर्कता बाळगावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR