लातूर : प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद लातूर शाखेच्यावतीने ‘जल्लोष लोककलेचा’ या बालकांसाठीचा दोन दिवसीय लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन ३१ ऑगस्ट रोजी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा व सिने अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी बालरंगभूमी परिषद बालकांना हक्काचे रंगमंच उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले.
येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, परिषदेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, सहकार्यवाह असिफ अन्सारी, ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे, डॉ. दीपक वेदपाठक, संतोष कुलकर्णी, भारत थोरात आदी उपस्थित होते. अलीकडेच महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या निलम शिर्के याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या नाट्य, नृत्य, संगीत, चित्र आदी कलाप्रकारात नैपुण्य मिळवणा-या तसेच मिळवू इच्छिणा-या बालकांना आपले कलागुण सिद्ध करण्यासाठी बालरंगभूमी महाराष्ट्रात हक्काचा मंच उपलब्ध करुन दिला जाईल.
लातूरच्या बाल कलाकारांचे कलाविष्कार बघून त्यांनी इथल्या मुलांना रत्नागिरी येथील १०० व्या नाट्य संमेलनात संधी देणार असल्याचे सूतोवाच केले. तर जिल्हाधिका-यांनी बालकांचे कौतुक करताना सांगितले की, शिक्षण आणि संस्कृती संपन्न असलेल्या लातूरची मी जिल्हाधिकारी असल्याचा मला अभिमान वाटतो. दोन दिवस चालणा-या या महोत्सवात समूह लोकनृत्य, एकल लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल लोकगीत, एकल लोकवाद्य या पाच कलाप्रकारांचे सादरीकरण होणार असून यात लातूर जिल्ह्यातील ७५६ बालकलाकार सहभागी होत आहेत. कलाकारांना प्रोत्साहनपर पारितोषिके व सहभाग परमनप्र देण्यात येणार
आहे.
हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे सुमती सोमवंशी, मयूर राजापूरे, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, प्रा. नवलाजी जाधव, रवी अघाव, रणजीत आचार्य, अॅड. बालाजी म्हेत्रे, वनिता गोजमगुंडे, सलीम पठाण, रविकिरण सावंत, महेश पवार, प्रिती ठाकूर, तन्मय रोडगे, विश्वजीत पांचाळ, विशाल वाटवडे, महेश बिडवे, ऋतूराज सुरवसे, आकाश कुलकर्णी, दुनगावे, अभिजीत भड, अभिषेक शिंदे आदी परिषदेचे पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.