पुणे : प्रतिनिधी
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. पुढील दोन आठवड्यांत लागोपाठ कमी दाबाच्या क्षेत्रांची शक्यता असल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास काहीसा उशिरा सुरू होऊ शकतो, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी सप्टेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला. गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये राज्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. एक ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात एकत्रितपणे दोन टक्के पाऊस जास्त नोंदला गेला. पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागांतील एकूण बारा जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला. सप्टेंबरमध्ये राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.
डॉ. महापात्रा म्हणाले, ‘तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ईशान्येकडील राज्ये आणि लडाखचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुढील तीन आठवड्यांमध्ये लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रभावामुळे या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, मान्सूनचा परतीचा प्रवासही काहीसा लांबू शकतो.’