19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्यामराठवाड्यात धो-धो पाऊस

मराठवाड्यात धो-धो पाऊस

नांदेडमध्ये २६ जिल्ह्यात अतिवृष्टी, हिंगोलीत मुसळधार, परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटला, लातूर, धाराशिवमध्ये संततधार, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

लातूर/नांदेड/परभणी/हिंगोली/बीड : प्रतिनिधी
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर नसला तरी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत शनिवारी मध्यरात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. लातूर, धाराशिवमध्ये रविवारी दिवसभर सरीवर सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तर जोरदार पाऊस कोसळत असून, नांदेड जिल्ह्यात २६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोलीत तर रस्त्यांसह सखल भागाला तलावाचे स्वरूप आले असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. परभणी जिल्ह्यात तर मासोळी, मुद्गल धरण तुडुंब भरले असून, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

छ. संभाजीनगर, जालना जिल्हा वगळता मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतशिवारात पाणीच पाणी साठल्याने खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे अशीच संततधार सुरू राहिल्यास खरीप पिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यानंतर रविवारी दिवसभरही जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहिला. रात्री उशिरापर्यंत या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दिवसभर जनजीवन ठप्प झाले. तसेच शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले.

हिंगोलीत सर्वत्र पाणीच पाणी
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे हिंगोली शहरातील सखल भागाला तलावाचे स्वरूप आले असून रस्त्यावरील वाहनेही पाण्यात बुडाली आहेत. या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे हिंगोली तालुक्यातील अंभेरी येथील साठवण तलाव भरला असून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस कळमनुरी तालुक्यात झाला.

पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलविले
हिंगोली शहरातील जिजामातानगर, बांगर नगर, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, डिग्रस, कोंढूर आदी भागांत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, खानापूर ते इसापूर अंभेरी रोडवर पुराचे पाणी आले आहे. तसेच सावरखेडा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

नांदेडमध्ये मुसळधार
नांदेड जिल्ह्यातही शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी दुपारपर्यत पाऊस सुरू होता. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९३ पैकी २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे अनेक भागात पुराचे संकट निर्माण झाले असून खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबधित यंत्रणेस सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५६.१० मिमी पावसाची नोंद झाली. सर्वांधिक १३६.८० मिमी पाऊस किनवट तालुक्यात झाला तर हिमायतनगरमध्ये १०३.४० मिमी, माहूर तालुक्यात ९३.६० मि. मी., हदगाव तालुक्यात ८०.६० मि. मी., भोकर तालुक्यात ६६.५० मिमी पाऊस पडला. इतर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम आहे.

नांदेडमध्ये २६ महसूल मंडळांत अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या २६ महसूल मंडळापैकी सर्वांधिक १७८.७५ मिलिमीटर पाऊस किनवट तालुक्यातील सिंदगी महसूल मंडळात झाला. त्या खालोखाल १६५ मिलीमीटर पाऊस इस्लापूर मंडळात पडला. जलधारा महसूल मंडळात १३८, मांडवा १५३.२५, दहेली ११२, उमरी बाजार १६०.२५, शिवणी १०२, किनवट १४०, बोधडी मंडळात ८१.२५ मिमी पाऊस झाला. हदगाव तालुक्यातील आष्टी महसूल मंडळात ११२ मिमी, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव मंडळात ११८.२५, माहूर तालुक्यातील माहूर महसूल मंडळात ११७.७५, सिंदखेड मंडळात ९१.५० मिमी, वाई मंडळात ८८.७५ मिमी पावसाची नोंद झाली.

परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पाणी आले असुन शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले आहेत. पाण्याची आवक वाढल्याने पाथरी तालुक्यातील मुदगल धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पुर्णा ते झिरो फाटा व दैठणा माळसोन्ना या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पालम तालुक्यात लेंडी नाल्याला पूर आला.

पाथरी तालुक्यातील मुदगल धरणाचे दोन दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला. तसेच लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. येलदरी धरण ४१.८६ टक्के, तारुणगव्हाण बंधा-यात ४२ टक्के पाणीसाठा वाढला आहे. पुरामुळे दैठणा ते माळसोन्ना रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील पूर्णा नदीला पूर आल्याने पूर्णा ते झिरो फाटा या रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आहे. सेलू शहरात अतिवृष्टी (१०२ मी.मी. पाऊस) झाल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. अर्जुननगर, सहारा नगर व नाला रोड शनिमंदिर या भागात पाणी तुंबल्याने तीन फटा रस्ता पाण्यात गेला.

धाराशिव जिल्ह्यात रिपरिप
धाराशिव जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू असून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यात दिवसभर सरीवर सरी सुरूच होत्या. त्यामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. रविवार असल्याने अनेक व्यापा-यांनीही दुकाने बंद ठेवली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. शेत शिवारातही पाणी साठायला सुरुवात झाली आहे. तरीही अजून जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR