जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्टवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजपा घरवापसी होईल, अशी चर्चा होती. मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झाली नाही, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही
भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच आता भाजपामध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
खडसे गोंधळलेल्या अवस्थेत : प्रवीण दरेकर
याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, खडसेंच्या प्रवेशासंदर्भातला निर्णय झालेला नाही. पण, जळगावातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. भारतीय जनता पार्टी ही काही ये जा करणा-यांचा पक्ष नाही. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही लक्षात येणार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही राष्ट्रवादीत जाणार हे अभिप्रेत नाही. पंतप्रधान जळगावला आले होते त्यावेळेस खडसेंना अपेक्षा असेल की, आम्हाला बोलावतील, मात्र हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून पक्ष निर्णय घेत असतो. खडसेंनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विषय आहे. परंतु राजकीय गोंधळलेल्या अवस्थेत खडसे दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली