22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रशक्ती कायद्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंगळवारी आंदोलन

शक्ती कायद्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंगळवारी आंदोलन

अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या शक्ती कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केली असून यासाठी आज मंगळवारी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून आंदोलन केले जाणार आहे. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान हे आंदोलन होणार असल्याची माहिती पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर अन्याय झाला. तेव्हा झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्ते आरोपीला फाशी देण्याची मागणी करीत होते मात्र सध्याच्या कायद्यात फाशी देण्याची तरतूद नाही. यामुळे आरोपीला लवकरात लवकर फाशी देता येईल, अशा पद्धतीचा कायदा आमचे सरकार असताना आम्ही आणला होता. सर्वपक्षीय २१ आमदार, वरिष्ठ सचिव, स्त्री विषयक काम करणारे कार्यकर्ते यांनी अभ्यास करून शक्ती कायदा तयार केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेतही हे विधेयक संमत झाले. त्यानंतर विधेयकाचे रुपांतर कायद्यात व्हावे यासाठी हा कायदा आम्ही केंद्र सरकारला पाठवला; पण अजूनही केंद्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडे या कायद्याचे प्रारुप धूळ खात पडले आहे, असे सांगत देशमुख यांनी, शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी देशमुख यांनी या वेळी केली.

शक्ती कायदा मंजूर व्हावा यासाठी आपण केंद्र सरकार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. शक्ती कायदा राज्यात लागू झाला तर दोषीला फाशी देता येईल आणि महिलांवर अत्याचार करणा-यांना जरब बसेल, असेही देशमुख या वेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR