26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडासायना नेहवालला सांधे खराब करणारा आजार

सायना नेहवालला सांधे खराब करणारा आजार

हैदराबाद : भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत धक्कादायक बातमी येत आहे. सायना संधीवात, सांधेदुखीपासून त्रस्त असून यामुळे ती निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गंभीर आजारामुळे सायनाला सराव करणे कठीण जात आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी सायना नेहवाल ही जगातील नंबर एकची खेळाडूही होती. तिचे सध्याचे वय हे ३४ वर्षे आहे. सायना ही भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१० आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदकही जिंकले आहे.

संधीवात असल्याची कबुली खुद्द सायनानेच दिली आहे. गगन नारंग यांच्या ‘हाऊस ऑफ ग्लोरी’ पॉडकास्टमध्ये सायनाने याची माहिती दिली आहे. तसेच हा आपल्या करिअरचा शेवटचा टप्पा असल्याचेही सायनाने म्हटले आहे. माझे गुडघे दुखत आहेत. मला संधिवात आहे. गुडघ्याची गादी खराब झाली आहे. यामुळे अशा परिस्थितीत ८-९ तास खेळाचा सराव करणे खूप कठीण आहे, सांधे खराब करणारा आजार मला झाला आहे, असे सायनाने म्हटले आहे.

मी सध्या दोन तासांचा सराव करू शकत आहे. जगातील अव्वल खेळाडूंवर मात करण्यासाठी दोन तास पुरेसे नाहीत, हे मला आता कुठेतरी स्वीकार करायला हवे आहे. निवृत्तीचा माझ्यावर काय परिणाम होईल यावर विचार करत आहे. परंतू हा निर्णय घ्यावाच लागेल, असे सायना म्हणाली. सायनाने गेल्या वर्षी शेवटची स्पर्धा खेळली होती.

ऑलिम्पिकमध्ये खेळणे माझे लहानपणीचे स्वप्न होते. सलग दोन ऑलिम्पिक मी खेळू शकले नाही हे मनाला वाईट वाटणारे आहे. मी वयाच्या ९ व्या वर्षी सुरुवात केली. पुढच्या वर्षी मी ३५ वर्षांची असेन. निवृत्ती घेणे वेदनादायी असेल, असेही सायना म्हणाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR