27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूररेणा नदीतून १८८७.६७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

रेणा नदीतून १८८७.६७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

रेणापूर : प्रतिनिधी
रेणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट  क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसांपासून दमदार  पाऊस पडत असल्याने या प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे व प्रकल्पात येणा-या पाण्याची  आवक लक्षात घेऊन सोमवारी दि. २ सप्टेबर रोजी सकाळी ९.३० वाजता धरणाचे दोन दरवाजे तर दुपारी १२ वाजता चार दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात येऊन  रेणा नदी पात्रात १८८७. ६७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊसाने  तालुक्यातील ३ साठवण तलाव १०० टक्के तर २ साठवण तलाव भरण्याच्या स्थितीत आहेत. तसेच रेणा नदीसह चारही बॅरेजेस दुथाडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या शेतक-यांंनी सतर्क राहवे, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र २ चे कार्यकारी अभियंता रा सु जगताप व शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.
गत वर्षी रेणापूर तालुक्यात व  रेणा मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने या प्रकल्पात एक टक्काही पाणीसाठ्याची वाढ झाली नाही. पूर्वीच्याच असलेल्या  २० टक्के पाण्यावर तालुक्यातील निम्या गावाची तहान भागवण्याची वेळ आली होती. उन्हाळ्याच्या शेवटी या प्रकल्पात केवळ १ ते २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या नागरीकांतून चिंंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून प्रकल्प पाणलोट व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अगदी काही दिवसांतच तळ गाठलेल्या प्रकल्पात टप्या-टप्याने वाढ होत गेली. सुरुवातीला २० टक्के, जुलै महिन्यात ३५ टक्के, ऑगस्ट महिन्यात ६५ टक्के पाणीसाठा जमा झाला.
 दरम्यान शनिवारी दि ३१ ऑगस्टपासून तालुका व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावण्याने दि २ सप्टेबर रोजी प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने व पाण्याची आवक पाहता सोमवारी दि २ सप्टेबर रोजी सकाळी ९ .३० वाजता धरणाचे दोन दरवाजे तर दुपारी १२ वाजता चार दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात येऊन रेणा नदी पात्रात १८८७.६७   क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.  एकूणच हा प्रकल्प तुडुंंब भरल्याने तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने व शेतक-यांच्या सिंंचनाचा प्रश्न मिटला गेला असल्याने शेतकरी व जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR