लातूर : प्रतिनिधी
दिपावलीनंतर तापमानात घट होण्यास सूरुवात झाल्याने थंडी वाढीस लागली आहे. परिणामी गेल्या आठ ते दहा दिवसापासून अंड्यांना मागणी वाढल्याचे व्यापा-यांनी सांगीतले आहे. लातूर जिल्ह्यात सध्याच्या घडीला दरदिवशी जवळपास २० ते ३० हजार नग अंडी फस्त केली जात असल्याचे होलसेल व्यापा-यांकडून सांगण्यात आले. अंड्यांना मागणी वाढल्याने त्याचे दरही काहीसे वधारले आहेत. सध्या एका क्रॅरेट अंड्यासाठी १६५ रुपये मोजावे लागत आहेत. तर १०० नगाला ५५० रुपयांचा दर आहे.
एका कॅरेटमध्ये ३० अंडी असतात. थंडीच्या काळात हेच दर राहतील, असा अंदाज असून जानेवारी ते फेब्रुवारीनंतर तापमानात जसजशी वाढ होईल तसे दरही कमी होतील. फेब्रुवारीनंतर प्रतिकॅरेट १०० ते ११० रुपये असे दर राहण्याचा अंदाजही व्यापारी अक्षय जाधव यांनी व्यक्त केले. अंडी ही हिवाळ्यात शरीरासाठी पोषक राहतात. ही बाब लक्षात घेता अंड्यांना मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर अंडयांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. थंडीची चाहूल लागताच वाढलेल्या मागणीमुळे लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून आठवड्यातील दोन ते तीन दिवस अंड्यांची आवक होते. शहरातील बाजारपेठेत जवळपास एक दिवसात ४० ते ५० हजार नग अंडी दाखल होत आहे. सध्या ठोक बाजारात अंड्यांचा दर प्रतिशेकडा ५५० रुपये मिळत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, चातुर्मास या काळात अंड्यांची मागणी कमी होत असते. हिवाळ्यात तब्येतीला पोषक म्हणून अंड्यांचा खुराक अनेकजण सुरु करतात. त्यामुळे अंड्यांना नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मागणी वाढते, गतवर्षाच्या तूलनेत यंदा अंड्यांंची मागणी काही प्रमाणात वाढली आहे.
थंडीच्या हंगामात मांसाहार जास्त केला जातो. जे मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी मध्यम मार्ग म्हणजे अंडी. ती उष्ण आणि अधिक प्रमाणात प्रोटिन्स देणारी असतात. त्यामुळे साधारणपणे या काळात अंड्यांच्या मागणीत वाढ होते. गेल्या आठ दिवसापासून अधिकची थंडी जाणवू लागली असून अंड्यांची विक्रीदेखील वाढल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत दिसून येत आहे. थंडीत मागणी वाढती राहणार असून, अंड्याचे वाढलेले दर जानेवारीच्या मध्यापर्यंत कायम राहतील, असे व्यापा-यांनी एकमतशी बोलताना सागीतले आहे. नाशट्यामध्ये अनेक जण अंड्यांचा वापर करत असतात. हिवाळ्यात अंड्याला चांगलीच मागणी असते. काही दिवसापासून थंडी वाढू लागल्याने अंड्यांचे भावही आता वाढू लागले आहेत. आवक पुरेशी असली तरी मागणी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये डझन मिळणा-या अंड्यांचे दर आता ७० रुपयांवर गेले आहेत. तर १०० नग अंड्यांला ५५० रूपये माजावे लागत आहे.