25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रलालपरीला ब्रेक

लालपरीला ब्रेक

कर्मचा-यांच्या काम बंद आंदोलनाचा प्रवाशांना फटका

मुंबई : प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचा-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. एसटी कामगार संयुक्त कृति समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे डेपोत बस उभ्याच आहेत. त्यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. या आंदोलनामुळे राज्यभरात एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे. मुंबई सेंटर येथील एसटी बस डेपोमध्ये या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळते.

गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते. अनेकांनी गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षणदेखील केले आहे. अशातच कर्मचा-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. साडेसातची एसटी बस होती. मात्र एक-दीड तास होऊनही बस डेपोतच होती. त्यानंतर प्रवाशांना ही बस कुठेही जाणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. दोन महिन्यांआधी रिझर्व्हेशन करूनही अशी अवस्था असल्याचा संताप प्रवाशांनी केला आहे.

पुण्यातही एसटी कर्मचा-यांचे आंदोलन
पुण्यातही एसटी कर्मचा-यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट बसस्थानकातून बाहेरगावी जाणा-या सर्व एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. रात्रीसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार आहेत. ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास ५०० च्यावर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तसेच, स्वारगेट स्थानकात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

रायगडात एसटी आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद
एसटी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृति समितीने पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावर हजर आहेत. सर्वच आगारातून सकाळपासूनच्या नियमित फे-या सुरू आहेत.

हिंगोलीत प्रवासी ताटकळले
४२० बस झाल्या कॅन्सल
जवळच्या आणि लांब पल्ल्याच्या सर्व बसफे-या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हिंगोली आगारामधून आज सकाळपासून एकही बस बाहेर निघालेली नसून ४२० बसफे-या रद्द करण्यात आल्या आहेत. हिंगोली आगारात एकूण १२० चालक आणि १२५ वाहक कर्तव्यावर आहे तर या सर्व कर्मचा-यांनी आज बंद पुकारला आहे त्यामुळे बसस्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी बसची वाट पाहत आहेत.

अकोल्यातून एसटी बससेवा ठप्प
अकोल्यात एसटी कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अकोल्यातील आगार क्रमांक १ आणि २ मधून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे.

नाशकात पहाटेपासून बंद
नाशकात पहाटेपासून आगारातून एकही एसटी डेपोबाहेर न काढण्याचा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे.
शिर्डीत सकाळपासून कर्मचा-यांनी एसटी बसेस डेपोतच उभ्या करून ठेवल्या आहेत. शेकडो प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले आहेत. अमरावतीत एसटी कर्मचा-यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे करावे या मागणीसाठी आंदोलन केले आहे.

एसटी कर्मचा-यांच्या मागण्या
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच जुलै २०१८ ते जानेवारी २०२४ या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचे होल होणार हे निश्चित आहे. राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून ३ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR