मुंबई : प्रतिनिधी
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलावळांनी हा संप पुकारलाय, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मविआ सरकारच्या काळातच एसटी कर्मचा-यांना सातवा आयोग मिळणार होता. मात्र टक्केवारीवर नजर ठेवत एसटी कर्मचारी संघटनेने हा वेतन आयोग लागू होऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पिलावळांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व रिटायर्ड हार्ट लोक आहेत.
‘तुम लढो हम कपडे संभालेंगे’, असे हे लोक आहेत. महाविकास आघाडीच्या लोकांचे थोतांड सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही टक्केवारी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात सातवा वेतन आयोगाची घोषणा करणार होते. तशी चर्चा आमच्यासोबत झाली होती. मात्र, या संघटनांनी करार करा असे सांगितले, आणि यांनीच हे सर्व थांबवले.
आम्ही ६५ हजार कर्मचा-यांचे नेतृत्व करतो, आमदार पडळकर, पावसकर यांच्या संघटना या संपात उतरल्या नाहीत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
महाराष्ट्रात कुठेही बंद झालेला नाही, कारण नोटीस नाही. गिरीश देशमुख नावाचे अधिकारी उद्धव ठाकरेंचे आहेत, असा आम्हाला संशय आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. सातवा वेतन आयोग आम्ही मिळवून राहणारच, तो आमचा हक्काचा आहे. सुप्रियाताई तुम्हाला महाराष्ट्रातले काहीच माहिती नाही. या संघटनेतील लोकांनी कधीच महामंडळात व्यवस्थित नोकरी केली नाही. यांना करार पाहिजे, टक्केवारी पाहिजे, त्यामुळे कोणीही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. ‘आम्ही डंके की चोट पर सांगतो’, सातवा वेतन आयोग घेणारच, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत एसटी कर्मचारी नाहीत. तसेच एसटी बँकेकडे पैसे आहेत, अडीच हजार कोटी रुपये आहेत आमच्याकडे, आम्ही यात मध्यस्थी करू शकतो आणि शासनाला पैसे देऊ शकतो, असा दावाही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.