22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र१ सप्टेंबरनंतर अर्ज करणा-यांना मुकावे लागणार तीन हजारांना

१ सप्टेंबरनंतर अर्ज करणा-यांना मुकावे लागणार तीन हजारांना

अदिती तटकरे यांची माहिती लाडक्या बहिणींना मोठा धक्का

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला, त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे. पण ज्या महिला ही तारीख चुकवतील,१ सप्टेंबरनंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना या ३ हजार रुपयांना मुकावे लागणार आहे, असे अदिती तटकरे यांनी नमूद केले. यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.

यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता ती मुदत वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे. मात्र याच दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

३१ ऑगस्टपूर्वी अर्ज केला नसेल तर
लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती, त्या तारखेनंतरही ज्या महिला अर्ज भरतील, नाव नोंदणी करतील त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळेल, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत १ जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केले होते. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज आले असून पुण्यातून सर्वाधिक अर्ज आल्याची महिती समोर आली आहे. सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता (जुलै आणि ऑगस्ट महिना) हा ऑगस्ट महिन्यात जमा केला. त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना ३००० रुपये एकत्र मिळाले. सुमारे १४ लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.
ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR