25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू

पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू

तीन जणांवर निलंबनाची कारवाई

भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाशिंद पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकांसह दोन पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आले असून, या तिघांची चौकशी सुरू केली आहे. अनिकेत जाधव (२४) असे, मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच्छापूर येथील अनिकेतचे वाशिंद येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्न करण्याच्या उद्देशाने ते दोघे पळून गेले होते. मात्र अनिकेतने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकाने वाशिंद पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिस पथकाने दोघांचा शोध सुरू केला असता, ते दोघे मध्य प्रदेशात असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली. यानंतर आरोपी तरुणाला मुंबईत घेऊन येत असताना प्रवासादरम्यान त्याने ट्रेनच्या बोगीमधील टॉयलेटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर अनिकेतच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी अनिकेतला मध्य प्रदेश मधून ताब्यात घेणारे वाशिंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वांगड, पोलिस अंमलदार जोगदंड आणि चलवादी या तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR