छत्रपती संभाजीनगर : खैरे साहेब, या टायमाला तुम्ही बिनधास्त राहा, रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिश्नर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे, आणि हे संजय शिरसाट बोलतोय, काही दम आहे की नाही, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी गणेशोत्सवाची १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी करणा-या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.
भाषणाच्या शेवटी देखील, मी गणरायाकडे तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करतो, असे म्हणत राजकीय शेरेबाजी करायलाही शिरसाट विसरले नाहीत.
गणेशोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागातर्फे बोलावलेल्या समन्वय बैठकीला आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिका-यांनी विविध मागण्या मांडल्या. त्याचवेळी शिरसाट व खैरे यांच्या भाषणातील राजकीय शेरेबाजी व कोपरखळ्यांनी मात्र बैठकीत एकच हास्यकल्लोळ उडाला.
‘सीनिअर सिटिझन’ कोण ?
शिरसाट यांचा टोला
९ मिनिटांच्या भाषणामध्ये शिरसाट यांनी तीन वेळा खैरेंना पाहत मिश्किल टिप्पणी केली. शिवाय, इतरांच्या भाषणादरम्यान दहा ते पंधरा मिनिटे गुफ्तगू देखील केले. खैरेंपासून काही अंतरावर बसलेल्या पृथ्वीराज पवार यांना उद्देशून बोलताना शिरसाट म्हणाले की, तुम्ही आता ‘ओल्ड’ झाला आहात. सीनिअर सिटिझनने आता नव्यांना संधी द्यायला हवी. खैरेंनी पूर्वी सतरंज्या उचलल्याचे सांगून हे मान्य केले. खैरे साहेबांचे भवितव्य उज्ज्वल राहो अशी विघ्नहर्त्याला मी प्रार्थना करतो, असे म्हणत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. हे ऐकून खैरेंनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि सभागृहात एकच हशा पिकला.
सरकारचे सन्माननीय आमदार : खैरे
गणेशोत्सवादरम्यान मागण्या ठेवताना खैरे यांनी ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांचा मुद्दा मांडला. यावेळी जैस्वाल व शिरसाट यांच्याकडे पाहत ‘या आमदारांनी पैसे आणले.’ तुम्ही ते ड्रेनेजसाठी फोडले. त्यांचं मोठं नुकसान होतं, मग लोकं त्यांना जाब विचारतात, त्यापेक्षा तुम्हीच त्यांना नकार देत जा, असे म्हणत खैरे यांनी जैस्वाल व शिरसाट यांचा दोन वेळेस ‘सन्माननीय आमदार’ असा खोचक उल्लेख केला आणि सभागृहात एकच हशा पिकला.