19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रशिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत

शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत

निशिगंधा आपटेंनी पोलिसांना टीप दिली

ठाणे : प्रतिनिधी
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलिस ज्याचा दिवसरात्र शोध घेत होते तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातून ताब्यात घेतले.
जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेह-यावर मास्क घालून इमारतीमध्ये शिरत होता. मात्र, यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले.

गेल्या अनेक दिवसांपासून मालवणी पोलिस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. परंतु, जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतु, बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.

जयदीप आपटेचे वर्कशॉप त्याच्या घराजवळच आहे. या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आले. जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती. तिनेच पोलिसांना जयदीप घरी येत असल्याचे सांगितले. जयदीपने घरी परत यावे आणि तपासात सहकार्य करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळे पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली.
शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे आणि त्याचा एक मित्र १०दिवसांपूर्वी मालवणला पुतळा उभारलेल्या जागेला भेट देण्यासाठी निघाले होते. हेच त्याचे शेवटचे ‘ज्ञात’ लोकेशन होते. त्यानंतर पोलिसांना जयदीप आपटेचा माग काढता आला नव्हता. परंतु, बुधवारी तो अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.

जयदीपच्या वकिलांनी दावा फेटाळला
जयदीप आपटे हा रात्रीच्या अंधारात लपतछपत घरातील लोकांना भेटायला आला असताना पोलिसांनी त्याला पकडले, हा दावा जयदीप आपटे याच्या वकिलांनी फेटाळून लावला. जयदीप आपटेला रात्री लपतछपत येताना पोलिसांनी पकडले, हा दावा खोटा आहे. त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळेच जयदीपने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नाही. आम्ही पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरवले होते. त्यामुळे जयदीपने कुटुंबियांशी चर्चा करून आज सरेंडर करायचा निर्णय घेतला होता. तो अंधारामध्ये लपतछपत घरच्यांना भेटायला आला, ही माहिती निराधार आहे, असा दावा जयदीपचे वकील गणेश सोवनी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR