लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात दि. १ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील ५ हजार ७६८ हेक्टर क्षेत्रावरील खरिप पिके बधित झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदत करावी, असे आवाहन शासनस्तरावरुन करण्यात आले असले तरी चार दिवस उलटुन गेले तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी नूकसान झालेल्या पिकांचा प्राथमिक नजर अंदाज घेतला गेला असून या प्राथमिक नजर अंदाजातच ‘पंचनामे’?, अशी परिस्थिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी आहे. दि. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृ्ष्टी झाली. काही महसूल मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे सर्वाधिक नूकसान झाले. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानूसार लातूर जिल्ह्यातील ३२ महसूल मंडळात खरीप पिकांचे नूकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकांमध्ये सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका आदी पिकांसह भाजीपाला तसेच पपई, डाळींब, मोसंबी, केळी आदी फळबागांचेही मोठ्याप्रमाणत नूकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास नुकसाचीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचा पाण्यात बुडून अथवा जादा पावसामुळे झालेल्या नूकसानीबाबतची संबंधीत शेतक-यांनी त्वरीत संबंधीत पीक विमा कंपनीस कळविली पाहिजे. त्यानूसार नुकसानीचे पंचानामे करण्याच्या कामासही गती येईल, असे सांगण्यात येते. त्यानुसार हजारो शेतक-यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवली आहे. परंतू, अद्यापही जिल्ह्यातील कृषी विभागाची यंत्रणा प्राथमिक नजर अंदाजातच चाचपडत आहे.