कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टर हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला. पोलिसांनी घाईघाईने आमच्या मुलीचे अंत्यसंस्कार केले. तसेच पोलिसांनी आम्हाला पैशांची ऑफरही दिली होती. परंतु आम्ही ती लगेच नाकारली. असा गौप्यस्फोट पीडितेच्या पालकांनी केला आहे.
पोलिसांनी मृतदेह पाहू दिला नाही. आम्हाला स्टेशनवर थांबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला तर मृतदेह ताब्यात दिल्यावर एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला आम्ही नकार दिला, असा आरोप पीडितेच्या पालकांनी पोलिसांवर केला. घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय घटनास्थळाजवळ दिसत असून त्याचे ब्लूटूथ हेडफोनही घटनास्थळाजवळ सापडले आहेत.डॉक्टरला गंभीर जखमी केल्यानंतर संजयने गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर पॉलीग्राफ चाचणीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.