कंधार : प्रतिनिधी
रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजूंना भाऊच्या डब्याच्या माध्मातून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे मी माझे भाग्य समजतो. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुरू करण्यात आलेला ‘भाऊचा डब्बा ‘ हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू राहील. मागील तीन वर्षांपासून यात खंड पडला नाही. पुढेही पडणार नाही. शेवटच्या श्वासा पर्यंत भाऊच्या डब्याच्या माध्यमातून रुग्णांना बरोबरच गोरगरीब, उपेक्षितांची सेवा करणार, असा निर्धार भाऊच्या डब्याचे संकल्पक प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी व्यक्त केला.
भाऊचा डब्बा या उपक्रमाने नुकताच बाराशे दिवसाचा पल्ला ओलांडला. जेष्ठ स्वतंत्र सेनानी, शिक्षणमहर्षी, माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दि. १ मे २०२१ पासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी “भाऊचा डब्बा” हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाने १२०० दिवसाचा पल्ला ओलांडला आहे.
दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी नाहिरेवाल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले. त्यांना न्याय मिळवून दिला. मन्याडखोऱ्यात शैक्षणिक दालने उघडून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. उपेक्षित, शोषित समाज त्यांचा केंद्रबिंदू होता. त्यांचे विचार आजच्या काळाला दिशा देणारे आहेत. त्यांनी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचा वसा पुढे चालविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून रुग्ण सेवा त्याचाच एक भाग असल्याचे प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी यावेळी सांगितले.
माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या हयातीत गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी अहोरात्र प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे करीत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी “भाऊचा डब्बा” या नावाने अन्नदानाचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाने नुकताच बाराशे दिवसाचा पल्ला गाठला आहे.