25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीय२५ वर्षांनंतर कारगिल युद्धाच्या कटाची कबुली

२५ वर्षांनंतर कारगिल युद्धाच्या कटाची कबुली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती, अशी सार्वजनिक कबुली पाकिस्तानी आर्मीकडून देण्यात आली. २५ वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानने जाहीरपणे ही कबुली दिली आहे. या अगोदर पाकिस्तानने सातत्याने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचा इन्कार केला होता. परंतु कारगिल युद्धाचा कट पाकिस्ताननेच रचल्याचे आता उघड झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीच याची जाहीर कबुली दिली आहे.

संरक्षणदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी यासंदर्भात प्रथमच कबुली दिली. १९६५ चे युद्ध असो, १९७१ चे युद्ध असो किंवा १९९९ चे कारगील युद्ध असो देशासाठी आणि इस्लामसाठी पाकिस्तानी सैनिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पाकिस्तानात शूरवीर सैनिकांचा एक समूह आहे, जो पाकिस्तानसाठी काहीही करायला तयार आहे. १९४८, १९६५, १९७१ युद्ध असो किंवा १९९९ चे कारगिल युद्ध असो, देशातील हजारो जवानांनी देश आणि इस्लामसाठी बलिदान दिले आहे, असे असीम मुनीर म्हणाले. या विधानाद्वारे पाकिस्तानी आर्मीने २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कारगिल युद्धातील भूमिका मान्य केली आहे. यापूर्वी या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नसून हा मुजाहिद्दीन यांनी केलेला हल्ला होता, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती.

१९९९ मध्ये कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवला होता. मात्र, सुरुवातीला हे पाकिस्तानी सैनिक नसून मुजाहिद्दीन आहेत, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती. त्यानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजयची सुरुवात केली. तीन महिने चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

५२७ भारतीयांना गमवावे लागले प्राण
कारगिल युद्धादरम्यान संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. ५ जुलै रोजी शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली. या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR