मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील अर्थमंत्र्यांबाबत जे बोलले ते बरोबरच असून त्याचे मी समर्थन करतो. केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचे सरकार असतानाही अर्थ खात्याने मनमानी कारभार केला, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता नोंदवले. याशिवाय राज्यातील या पाच वर्षांतल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असतानाच उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की, आपण स्वत: आठ पंचवार्षिक पाहिलेल्या आहेत. दुर्दैवाने सध्याची पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट ठरली. राज्याच्या हिताचा विचार न करता सत्तेच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले. राजकारणाचा घसरलेला हा स्तर मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या राज्यासाठी भूषणावह नाही. अर्थ खात्याचे काम पाचही वर्षांत कधीही न्यायाचे झाले नाही.
वास्तविक तुमच्याकडे अर्थ खाते म्हणजे सगळे तुमचेच असे समजण्याचे कारण नसते. सर्व राज्याला समान न्याय या तत्त्वाने कारभार न करता फक्त आपल्या मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला. त्यांच्याच विभागात विकास कामे करण्याचा धडाका लावला. मात्र या विकास कामांतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने हा पैसा गेला कुठे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. निधी वाटपाबाबत पाचही वर्षे भेदभाव केला गेला. आघाडी सरकार असताना वेळोवेळी आपण त्याची तक्रार योग्य ठिकाणी केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या खात्यात इतके अयोग्य निर्णय घेतले गेले असा गंभीर आरोपही थोरात यांनी केला.