नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळत आहे. अशातच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोईन अलीची निवृत्ती हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण संघाला पुढील मालिका ऑस्ट्रेलियासोबत खेळायची आहे.
मोईन अली म्हणाला, मी आता ३७ वर्षांचा झालो आहे. या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी माझी निवड झालेली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो. आता पुढच्या पिढीसाठी वेळ आली आहे.२०२१ च्या अखेरीस मोईनने कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. पण २०२३ मध्ये कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या विनंतीवरून त्याने अॅशेस मालिकेपूर्वी आपला निर्णय बदलला. अॅशेसनंतर मोईनने पुन्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हा मोईन अलीने कसोटीलाच अलविदा केला होता, पण आता त्याने तिन्ही फॉरमॅटला अलविदा केला आहे.
अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणले, त्यात भारतीय दिग्गज विराट कोहलीचे नाव देखील सामील आहे. कोहलीने मोईनविरुद्ध खूप संघर्ष केला आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १० वेळा त्याचा बळी ठरला. या काळात मोईनने कसोटीत सर्वाधिक ६ वेळा विराटची विकेट घेतली.
मोईन अलीची क्रिकेट कारकीर्द
मोईन अलीने इंग्लंडसाठी ६८ कसोटी, १३८ एकदिवसीय आणि ९२ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये कसोटी सामन्यांमध्ये मोईनने गोलंदाजी करताना २०४ बळी घेतले आहेत आणि फलंदाजी करताना ३०९४ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने फलंदाजी करताना २३५५ धावा आणि गोलंदाजी करताना १११ विकेट घेतल्या. याशिवाय मोईनने टी-२० मध्ये १२२९ धावा आणि ५१ विकेट घेतल्या होत्या.