मुंबई : राज्यात विधानसभेसाठी तिस-या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा होणार आहेत. उद्या हे प्रमुख नेते एकत्रित दौरा करणार आहेत. त्यांचा नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पाहणी दौरा होणार आहे. त्यामुळे राज्यात तिस-या आघाडीचे संकेत मिळाले आहेत.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील युती किंवा आघाडीसोबत जाण्याची चाचपणी सुरु केली आहेत. त्यातच राज्यात तिस-या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड आणि परभणी दौ-यावर छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य पक्ष प्रमुख), बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख), राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना), डॉ. राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) आणि नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी) हे नेते असणार आहेत. यावेळी ते शेतक-यांची कैफियत ऐकून घेणार आहेत. छोट्या राजकीय पक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत जागा वाटपासाठी बोलणी सुरु केली आहे. मात्र, आधीच युती-आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष असल्याने छोट्या पक्षांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष विविध पर्याय अवलंबत आहेत. राज्यातील तिस-या आघाडीच्या प्रयोगाला देखील याच नजरेतून पाहिले जात आहे. विधानसभेला देखील ही आघाडी दिसून येते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कोण आहेत तिस-या आघाडीतील नेते?
– छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य पक्ष प्रमुख)
– बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख)
– राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
– डॉ. राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया)
– नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी)
ही मतलबी खेळी : नारकर
‘भाजप प्रणीत महायुतीच्या विरोधातील सर्व लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांच्या एकजुटीचा विस्तार करत ‘मविआ’ राज्यात परिवर्तन घडवून आणू शकेल, असा विश्वास व्यक्त करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभेत तिसरी आघाडी करण्याचा दिलेला प्रस्ताव फेटाळला. लोकसभा निवडणुकीचा कौल ‘मविआ’च्या बाजूने दिला असतानाही तिसरी आघाडी स्थापन करण्याचा विचार ही धूर्त आणि मतलबी खेळी असल्याची चपराक माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी लगावली आहे.