बुलडाणा : राज्यातील काही भागत अतिसाराचे संकट वाढत असल्याची चित्र आहे. असे असताना महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या दुर्गम अशा बुलडाणा जिल्ह्यातील गोमाल गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोमाल या गावामध्ये अतिसाराच्या लागणमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे जळगाव जामोद आणि मध्यप्रदेशातील बु-हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नसल्याचे चित्र आहे.
परिणामी, अतिसारामुळे मृत झालेल्या रुग्णांना रुग्णालयात न्यायला वेळ झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मृत्यूनंतरही या रुग्णांचे मृतदेह गावात नेण्यासाठी १५ किलोमीटर झोळीत टाकून त्यांना न्यावे लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ता नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तर राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून या घटनेचा व्हीडीओ आता समाज माध्यमांमध्ये प्रचंड वायरल होत आहे.
आरोग्य प्रशासन अनभिज्ञ?
तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे. तर गोमाल या गावात आणि परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.
अतिसाराची लक्षणे
अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटा घटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पूर्ववत होणे, बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणेकिंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.