22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ राबवा

महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ राबवा

अजित पवारांची अमित शहांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे मोठा प्रस्ताव ठेवला. ‘‘निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ राबवा,’’ अशी मागणी अजित पवार यांनी अमित शहांसमोर ठेवली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर होते. या दौ-यादरम्यान महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांनी बैठक घेत आगामी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चाही केली. या बैठकीतील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.

अमित शहा रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले होते. मुंबई दौ-याचा समारोप झाल्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला. ‘‘निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री करा. महाराष्ट्रातही ‘बिहार पॅटर्न’ राबवा,’’ असा प्रस्ताव अजित पवारांनी गृहमंत्री शहांपुढे ठेवला आहे.

एकीकडे निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपली हुकलेली मुख्यमंत्रिपदाची संधी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. त्यातच आता अजित पवारांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केल्यामुळे आगामी काळात महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR